Tuesday, February 17, 2009

मराठा आरक्षणासाठी शिवनेरी येथे आंदोलन.

हिंगोली - मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी या मागणीसाठी गुरुवारी किल्ले शिवनेरी येथे आंदोलन केले जाणार असून, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना पाय ठेवू दिले जाणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सचिव मनोज आखरे यांनी दिला आहे.याबाबत संभाजी ब्रिगेडतर्फे प्रसिद्धिपत्रक काढण्यात आले आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करावा व आरक्षणाची मर्यादा वाढवून तीस टक्‍के आरक्षण मराठा समाजाला द्यावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने मागील काही वर्षांपासून आंदोलन सुरू केले आहे. लोकशाही, सनदी मार्गाने आंदोलन केल्यानंतरही शासनाने वेळोवेळी आश्‍वासन देऊन विश्‍वासघात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.त्यामुळे आता आरक्षण देता की चालते होता, ही भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली असून, मराठा ओबीसी आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण देऊन विकासाची संधी द्या, अन्यथा गुरुवारी मुख्यमंत्र्यांना पाय ठेवू दिला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणाचे संकेत देण्यात आले होते. मात्र, आचारसंहिता लावण्याची वेळ येत असताना कुठलाच निर्णय होत नसल्याने शासनाचा निषेध करीत आंदोलन केले जाणार आहे.या आरक्षण आंदोलनात हजारो संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रदेश सचिव मनोज आखरे यांच्यासह जिल्हाध्यक्ष दत्ता बोंढारे, राजू गोडबान, जगदीश देशमुख, मधुकर ढवळे, संतोष जाधव, श्‍याम गायकवाड, पांडुरंग ढवळे, गंगाधर इंगोले, प्रदीप खोंडे, आंबादास सोळंके, अशोक गव्हाणे, गजानन वानखेडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.