Thursday, November 20, 2008

आरक्षण विरोधकांना निवडणुकीत आडवे करणार - विनायक मेटे
औरंगाबाद, ता. १६ - मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांत समावेश करून मराठा म्हणूनच सर्व क्षेत्रांत २५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी रविवारी (ता. १६) येथे केली. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत आडवे केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा समन्वय समितीतर्फे घेण्यात आलेल्या मराठा आरक्षण परिषदेचे उद्‌घाटन श्री. मेटे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष किसनराव डे, छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. देवीदास वडजे, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयसिंह महाडिक, सुरेश माने, शंभूराजे युवा क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सुनील मोरे, आदर्श बॅंकेचे संस्थापक ए. ए. मानकापे, विष्णू गाडेकर, परशुराम वाखुरे, माजी महापौर सुदाम सोनवणे, नगरसेवक काशीनाथ कोकाटे, संजय तायडे, मिलिंद पाटील, दिलीप पेरे, मनोज पाटील आदी या वेळी उपस्थित होते. मराठा समाजाला राज्यकर्ता, जमीनदार, वतनदार अशी विशेषणे लावली जात असली, तरी वस्तुस्थिती तशी नसल्याचे श्री. मेटे यांनी स्पष्ट केले. सत्तेच्या खुर्चीला चिकटलेले मूठभर पुढारी सोडले, तर रोजगार हमी योजनेवर जाणारा शेतमजूर, आत्महत्या करणारा शेतकरी, बेरोजगार युवक यांच्यासाठी आरक्षणाची लढाई लढायची असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील २८८ आमदारांपैकी मराठा फक्त ११३ आहेत. जिल्हा परिषदांच्या ३३ अध्यक्षांपैकी नऊ, तर नगरपालिकांच्या २७० अध्यक्षांपैकी ४४ अध्यक्ष मराठा समाजाचे आहेत. राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकपद भूषविण्याचा मान मराठा समाजाच्या व्यक्तीस फक्त एकदाच मिळाला आहे. मंत्रालयातील दीडशे सचिवांपैकी सातजण मराठा आहेत. अशा परिस्थितीत सुंभ जळाला, तरी पीळ कायम, अशा गुर्मीत मराठा वावरत असल्याचे श्री. मेटे यांनी सांगितले. भुजबळ, मुंडे आदी "ओबीसी' नेत्यांना मराठ्यांची मते पाहिजे असतील, तर त्यांनी "ओबीसी'चेच नव्हे, तर मराठ्यांचेही नेते व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात हा प्रश्‍न मार्गी लागला नाही, तर राज्य सरकारला सळो की पळो करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने मराठा आरक्षणास पाठिंबा दिला आहे. भाजपने पाठिंब्याची भूमिका घेतली आहे; परंतु शिवसेनेने मात्र याबाबत निर्णय घेतलेला नाही. ग्रामीण भागातील मराठा तरुणांच्या मतांवर मोठ्या झालेल्या शिवसेनेने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मराठा समाजात अढळ स्थान मिळवायचे असेल, तर मुख्यमंत्री देशमुख यांनी आरक्षण द्यावे, असे आवाहन श्री. वरखिंडे यांनी केले.

maratha seva sangh, sambhaji brigade, jijau brigade, shivdharma

No comments: