| |||
आरक्षण धनाढ्यांना नव्हे; तर गोरगरीब मराठ्यांना! सकाळ वृत्तसेवा Thursday, January 28, 2010 AT 12:34 AM (IST) मुंबई - श्रीमंत मराठ्यांना नाही; तर गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाचे लाभ मिळावेत यासाठी मराठा संघर्ष समितीचा लढा अविरत सुरू राहील, मराठा ही जात नसून तो समूह आहे; त्यामुळे कुणबी व मराठा यांच्यामध्ये कोणताही फरक नसून कुणबी व मराठा हे जातीने एकच आहेत. त्यांच्या हक्कासाठी अविरत लढण्यासाठी शिवनेरी येथे मराठा संघर्ष समिती शपथग्रहण करणार असल्याची घोषणा आज मराठा संघर्ष समितीने मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली. कुणबी मराठा समाजास 2010 वर्षाच्या अखेरीपर्यंत शिक्षण, नोकऱ्यांमध्ये; तसेच महाविद्यालयांमध्ये आरक्षण मिळायला हवे, यासाठीही महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे याबाबत प्रबोधन करणार असल्याचा मानसही या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत अविरत संघर्ष करण्याची भूमिका मांडत मराठा विकास संघटना, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, छावा संघटना, भारतीय मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, मराठा समन्वय समिती, बुलंद छावा, संभाजी ब्रिगेड, मराठा रियासत या साऱ्या संस्था-संघटनांनी एकत्र येऊन मराठा संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या संघर्ष समितीने मुख्यमंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशीही औपचारिक चर्चा झाल्याचे यावेळी सांगितले. मराठा आरक्षणामागील भूमिका स्पष्ट करीत असताना मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी कुणबी व मराठा यांच्यामध्ये कोणताही भेद नसल्याचे विषद केले. मराठा समाजास आरक्षण देण्याचे ठरवले तर त्याचा लाभ मराठा समाजातील श्रीमंत वर्गालाही मिळेल, धनाढ्य मराठा समाजातील मंडळीही या आरक्षणाचे फायदे घेतील, अशी आवई उठविण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आरक्षणाच्या सवलती मराठा समाजातील गोरगरीब जनतेसाठी असतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिक्षण आणि महाविद्यालयांमध्ये आरक्षण मिळविल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये राजकीय क्षेत्रात आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मानसही संघर्ष समितीकडून व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी असे जातीचे उल्लेख करणाऱ्यांना "ओबीसी'चे लाभ दिले. फक्त मराठा जात असणाऱ्यांना मात्र त्यातून वगळले. मात्र कुणबी आणि मराठा असा भेदाभेद नसून 1947 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, मराठा ही जात मागासलेली जात आहे; तसेच 1955 मध्ये कालेलकर आयोगाने भारतातील 2399 जातींचा "ओबीसी' मध्ये समावेश केल्याचे दाखले असल्याचे संदर्भही यावेळी संघर्ष समितीने यावेळी दिले. दरम्यान, मराठा आरक्षणाची मागणी करणारे विनायक मेटे यावेळी अनुपस्थित होते. |
Tuesday, November 30, 2010
आरक्षण धनाढ्यांना नव्हे; तर गोरगरीब मराठ्यांना !
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment