Monday, January 5, 2009




मुख्यमंत्र्यांच्या सभेत दोघांनी पेटवून घेतले

पंढरपूर, ता. ४ - कॉंग्रेसच्या जनजागरण यात्रेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाषण सुरू असतानाच संभाजी ब्रिगेडच्या सोलापूर येथील दोन कार्यकर्त्यांनी स्वतःच्या अंगावरील जॅकेट पेटवून घेतले. "ही घटना खेदजनक असून, अशा प्रकारे आपल्या मागण्यांसाठी दबाव निर्माण करणे योग्य नाही,' असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. येथील टिळक स्मारक मंदिराच्या मैदानावर कॉंग्रेसच्या जनजागरण यात्रेचा प्रारंभ आज दुपारी झाला. या कार्यक्रमात चव्हाण बोलत असताना समोरच्या प्रेक्षकांमध्ये बसलेले संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक महेश चव्हाण आणि कृष्णात पवार यांनी त्यांच्या अंगावरील जॅकेट अचानकपणे पेटविले. भाषण चालू असतानाही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात हा प्रकार लगेच आला आणि त्यांनी तातडीने पोलिसांना सावध केले, तसेच रुग्णवाहिका बोलावून त्या दोघांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या. या दोघांच्या पायांना जखमा झाल्या असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. या गोंधळानंतर अर्धवट राहिलेले भाषण चव्हाण यांनी नंतर पूर्ण केले. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ""मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी आयोगही नेमण्यात आला आहे, तरीदेखील या मागणीसाठी पेटवून घेण्याचा जो प्रयत्न केला तो खेदजनक आहे. ही पद्धत चुकीची आहे.'' या घटनेत जखमी झालेले चव्हाण म्हणाले, ""आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून अनेक वेळा निवेदने दिली आहेत; परंतु शासनाने दखल घेतली नसल्यामुळे आमच्यावर पेटवून घेण्याची वेळ आली आहे. आमच्या मागणीची त्वरित दखल घेतली गेली नाही तर यापुढे अधिक तीव्र निदर्शने केली जातील.''

मुख्यमंत्र्यांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न
मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सभेत संभाजी ब्रिगेडच्या दोघा कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली. महेश चव्हाण आणि कृष्णा यादव असे या दोघा कार्यकर्त्यांची नावे आहेत. हे दोघे सोलापूर संभाजी ब्रिगेडचे सक्रिय कार्यकर्ते आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज पंढरपूरच्या दौ-यावर होते. याठिकाणी त्याची जाहीर सभा होती. सभेला सुरुवातीला काही वक्त्यांची भाषणे झाली. त्यानंतर मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहिल्यावर काही क्षणातच स्टेजपासून ५० फूट अंतरावर संभाजी ब्रिगेडच्या दोघा कार्यकर्त्यांनी अंगातील जॅकिट पेटवून दिले आणि तो उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर भिरकावले. जॅकिट पेटवून घेणा-याच्या पायावर ते पडल्याने त्याला किरकोळ भाजले. त्यांना अटक केल्यानंतर कॉटेज रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, या घटनेची निंदा करत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा प्रकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला राजकिय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया घटनेनंतर पत्रकार परिषदेत व्यक्त केली.





आरक्षणाबाबत वेळकाढूपणाचे धोरण कशासाठी?- पुरुषोत्तम खेडेकर



उस्मानाबाद, ता. ४ - सर्व प्रमुख राजकीय पक्ष, ओबीसी संघटना अनुकूल असताना महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वेळकाढूपणाचे धोरण का स्वीकारत आहे? असा सवाल मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केला आहे.मराठा सेवा संघप्रणित वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने श्री. खेडेकर शनिवारी (ता. तीन) उस्मानाबादेत आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे, विभागीय अध्यक्ष कामाजी पवार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे या वेळी उपस्थित होते. "मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून वेगळे २५ ते ३० टक्के आरक्षण द्यावे, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मागील चार-पाच वर्षांत यासाठी आंदोलने झाली. सध्याच्या सरकारची भूमिका सकारात्मक आहे,' असे नमूद करून श्री. खेडेकर म्हणाले, की बापट आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, असे म्हटल्याचे चित्र निर्माण केले गेले आहे, ते बरोबर नाही. एखाद्या विद्यार्थ्याला प्रत्येक प्रश्‍नाच्या उत्तरात चांगले गुण द्यायचे; परंतु बेरीज करताना जाणूनबुजून चुकीचा आकडा लिहायचा, असा हा प्रकार आहे. त्यामुळे बापट आयोगाची शिफारस फेटाळून सरकारने सध्याच्या ओबीसी संवर्गातील १९ टक्के आरक्षणाला धक्का न लावता "विशेष इतर मागास प्रवर्ग' म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी आहे. महिनाभरात किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने हा निर्णय जाहीर करावा. सध्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मराठा आरक्षणाबद्दल नकारात्मक भूमिका नाही. त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी; अन्यथा महाराष्ट्र सरकार मराठा समाजाचा विश्‍वासघात करीत आहे, अशी भावना समाजात निर्माण होईल, असा इशारा श्री. खेडेकर यांनी दिला. कथा, कादंबऱ्या, चित्रपटांतून मराठवाडा व परिसरातील मराठा समूह हा जातीयवादी, अहंकारी, परंपरावादी, सरंमजामशाहीवादी आहे, असे चित्र तयार केले गेले आहे. त्यामुळे इतर समाजांशी त्याचे वितुष्ट निर्माण झाले आहे, असे समजले जाते. हा समाज परंपरावादी राहिला तर तणाव कायम राहतील. आरक्षणामुळे ओबीसी व मराठा एका पातळीवर आले तर मराठवाड्यातील सामाजिक चित्र बदलेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



राजकीय लाभ नकोत



मराठा समाजाचा ओबीसीत समावेश झाला तरी सध्याचे ओबीसी संवर्गातील जातींना मिळणारे राजकीय फायदे (स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण) आम्ही मागितलेले नाहीत, असे स्पष्ट करून श्री. खेडेकर म्हणाले, की विदर्भ, खानदेश, कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातील कुणबी मराठ्यांचा ओबीसीत समावेश आहे. मराठवाडा निझामशाहीत असल्याने त्यांना "मराठा' म्हणून नोंदले गेले आहे. मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यास त्याचा अधिक फायदा मराठवाड्यातील मराठा समूहाला होणार आहे. -------------------------------------------------------



No comments: