Saturday, January 10, 2009

मराठा समाजाच्या सहनशक्‍तीचा अंत पाहू नका




आरक्षणासाठी आंदोलनाचे धोरण एक फेब्रुवारीला ठरणार - विनायक मेटे
नांदेड, ता. १० - लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला सर्व क्षेत्रात २५ टक्के आरक्षण लागू करावे, याबाबत मराठा समन्वय समितीच्या वतीने राज्यभरातून आरक्षण जनजागृती यात्रा निघाली असून, त्याचा समारोप एक फेब्रुवारीला मुंबईच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात करण्यात येणार आहे. याचवेळी आरक्षणाच्या भूमिकेवरून आंदोलनाची रणनिती ठरविण्यात येईल, अशी माहिती मराठा समन्वय समितीचे प्रमुख विनायक मेटे यांनी शनिवारी (ता. दहा) येथे पत्रकार परिषदेत दिली. आरक्षण जनजागृती यात्रा शुक्रवारी (ता. नऊ) नांदेड जिल्ह्यात आली. लोहा येथील सभा आटोपल्यानंतर परभणी जिल्ह्यात जाण्यापूर्वी त्यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, की मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी शासनाने नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती आर. एम. बापट यांचा अहवाल मराठा समाजाच्या विरोधात आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून २५ टक्के आरक्षण दिलेच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी लोकशाही पद्धतीने अनेक आंदोलने केली आहेत. न्यायमूर्ती बापट यांनी आपला अहवाल मराठा समाजाच्या विरोधात दिला. या अहवालाची राज्यात अनेक ठिकाणी होळी करण्यात आली. आयोगातील एक सदस्य डॉ. रावसाहेब कसबे यांची नेमणूक छगन भुजबळ यांच्या आग्रहाखातर करण्यात आली, असा आरोपही श्री. मेटे यांनी केला. "उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड व डॉ. कसबे पूर्वीपासूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेच्या विरोधात आहेत. न्यायमूर्ती बापट आयोगाचा अहवाल फेरविचारासाठी पाठवावा, अशी मागणीही त्यांनी केली. पत्रकार परिषदेला डॉ. मनीष वडजे, सतीश किन्हाळकर, बाळासाहेब बोकारे आदींची उपस्थिती होती.

आरक्षणाची लढाई शासनाविरुद्ध - विनायक मेटे
परभणी, ता. १० - मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही समाजाने विरोध करू नये, आरक्षणाची ही लढाई शासनाविरुद्धची आहे, असे नमूद करून मराठा लोकप्रतिनिधींनी या लढ्यात सहभाग नोंदविला नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष, माजी आमदार विनायक मेटे यांनी शनिवारी (ता. १०) येथे दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी समन्वय समितीच्या वतीने राज्यभर रथयात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आज येथे आली. त्या वेळी जागृती मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात श्री. मेटे बोलत होते. ते म्हणाले, की मराठा समाजातील नेत्यांनी जातीचे राजकारण कधीच केले नाही. त्यामुळे मराठा समाज जातीयवादी नाही. इतर बहुजनांना घेऊन चालणारा हा समाज आता अडचणीत आला आहे. यासाठी इतर समाजांनी मराठा समाजाला आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा. आमच्या रास्त मागणीला कोणी आडफाटा आणत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखविण्याची ताकद आमच्यात आहे, हे शासन चालविणाऱ्यांनी समजून घ्यावे. आमची सहनशीलता पाहिली, आमचा उद्रेक पाहू नये. अरुण पेडगावकर यांना "मराठा मित्र पुरस्कार' प्रदान करण्यात आला. आसाराम लोमटे यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय वरपुडकर, नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी श्री. मेटे यांचा सत्कार केला. "शिवसंग्राम'चे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, विजयसिंह मंडलिक यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन बब्रुवान शेंडगे यांनी केले. प्रास्तविक बाळासाहेब मोहिते पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी मराठा समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष धाराजी भुसारे, डॉ. शंकरराव देशमुख, ज्ञानोबा माऊली शिंदे, डॉ. आर्यन चाटे, राजेंद्र थोरात, पांडुरंग खिस्ते, प्रवीण चव्हाण, त्र्यंबक डोंगरे, मधू नायक, गोविंद पोंडे, मधुकर भालेराव, प्रकाश भोसले आदींनी पुढाकार घेतला.
मराठा समाजाच्या सहनशक्‍तीचा अंत पाहू नका - विनायक मेटे
अहमदपूर, ता. १० - मराठा समाजाच्या सहनशक्तीचा अंत न पाहता त्यांना आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी माजी आमदार विनायक मेटे यांनी केली. मराठा समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण यात्रेच्या अनुषंगाने विमलबाई देशमुख कन्या शाळेत शुक्रवारी (ता. नऊ) झालेल्या सभेत श्री. मेटे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती दिलीप देशमुख, डी. बी. लोहारे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सोमेश्‍वर कदम, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील टाकळगावकर, विजयसिंह महाडिक, शंकरराव जाधव, बालासाहेब जगताप, भारत रेड्डी, बाळासाहेब धानोरकर, विनायक भोसले, विनायक चोबळीकर, बालाजी आगलावे यांची उपस्थिती होती. श्री. मेटे म्हणाले, राज्यकर्ते मराठा समाजाला झुलत ठेवत आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले नाही तर त्याचे दुष्परिणाम संबंधितांना भोगावे लागतील. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून त्यांना २५ टक्के आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे. सत्तेत असणारे मराठा समाजाचे नेते आरक्षणाच्या अनुषंगाने काहीच बोलत नाहीत तसेच काही कृतीही करत नाहीत. त्यामुळे त्यांना यापुढे सत्तेपासून वंचित राहावे लागेल. जिल्हा परिषद सदस्य श्री. पाटील यांनी मराठा आरक्षण यात्रेस पाठिंबा व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण वंगे यांनी केले. सूत्रसंचालन विलास साळुंके यांनी केले, तर आभार प्रा. अनंत माने यांनी मानले.

3 comments:

Paanthastha said...

Mala maaf kara. Mi suddha Maratha aahe, 96 kuli. Pan mala bilkul vatat nahi aplya samajala arakshan milava mhanun. Khara tar kuthlya hi samajala te milu naye asach vatate. Tumhi jar sarya maratha samajachya vatina lihila asel tar mi tyaat nakkich nahi. Majhi kahi karane aahet arakshanala virodh karanyachi ani ti tumhi anusarayla pahijetach asa majha mulich hetu nahi. Tasech tumchi kinwa ajun konachi tattve mala patatilach asa navhe.

Paanthastha said...

Ha sagla rajkarnyancha khel aahe ani mala hi 'vote bank' chi kheli bilkul manjoor nahi.

सुसाट said...

अशाने जातीवाद बोकाळेल. काही साधणार नाहीये. समाजाचा विकास साधायचा असेल तर मेटे यांनी शिक्षण अभियान हाती घ्यावे. ग्रामीण भागात अर्ध्यावर शिक्षण सोडावं लागणार्या लोकांसाठी निधी गोळा करावा.शाळाअ उभाराव्याअत. सरकार कडे अशा गोष्टींसाठी अनुदान मागावे.
्मराठे कधी आरक्षण मागतील असं मला जन्मात वाटलं नव्हतं. उद्या ब्राह्मण उठतील. आरक्षण द्या नाहीतर पेटवऊन घेउ म्हणतील. तर त्यांना पण आरक्षण द्यायचे का?