Saturday, January 24, 2009

आरक्षणासाठी 'करो या मरो'
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी 'करो या मरो' आंदोलनास प्रारंभ करण्याचा निर्धार गुरुवारी झालेल्या मराठा आरक्षण समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. एक फेब्रुवारीपर्यंत निर्णय न घेतल्यास १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी आणि रायगडावर मंत्र्यांना पाय ठेऊन न देण्याचे ठरवण्यात आले असल्याचे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितले. समितीची बैठक पुण्यात झाली. या बैठकीला खेडेकर, समितीचे अध्यक्ष शशिकांत पवार, मराठा महासंघाचे अध्यक्ष अंकुश पाटील, सरचिटणीस राजेंद कोंढरे आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड उपस्थित होते. एक फेब्रुवारीपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा. १५ फेब्रुवारीपूवीर् आरक्षण मिळाले नाही, तर बीड येथे होणाऱ्या महामेळाव्यात राजकीय हत्या की आत्महत्या करायची, हे ठरवण्यात येणार असल्याचे खेडेकर यांनी स्पष्ट केले. ओबीसींचे आरक्षण काढायचे नाही, तर मराठा समाजाला आरक्षण हवे आहे. मात्र, ते निवडणुकीत उमेदवारांना पाडण्याचे बोलत असतील, तर आम्हीही पाडू शकतो, असे आव्हान खेडेकर यांनी दिले. राज्यातील ९० आमदारांचा उघड पाठिंबा आहे. त्यांच्यासह १३२ आमदार पाठिशी असल्याचा दावा खेडेकर यांनी केला.

No comments: