Saturday, January 24, 2009

मराठा आरक्षणासाठी मुंबईत महामेळावा
सरकारने मराठा समाजाचे अन्य मागासवगीर्यांत आरक्षण करावे, या मागणीसाठी एक फेब्रुवारीला मुंबईत मराठा आरक्षण महामेळावा होणार असल्याचे सांगतानाच, आमच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर दिसत नाही, असा आरोप मराठा समन्वय समितीचे विनायकराव मेटे यांनी येथे केला. मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी मेटे औरंगाबादेत आले होते. 'लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर हे आरक्षण जाहीर झाले नाही तर तमाम मराठा समाज सध्याच्या राजवटीच्या विरोधात भूमिका घेण्यास मागे पाहणार नाही. त्यासाठी मराठा समाजाला इतर मागासवगीर्यांमध्ये समाविष्ट करण्यासाठी २००४मध्ये नेमलेल्या बापट समितीचा अहवाल मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत फेरविचारार्थ पाठवणे व न्यायमूतीर् सराफ आयोगाला विशिष्ट कालमर्यादा ठरवून नव्याने अहवाल मागविणे अत्यावश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया तातडीने करून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर मराठा समाजाचे आरक्षण जाहीर होणे आवश्यक आहे अन्यथा या समाजाला आपली मतपेढी म्हणून गृहित धरू नये, असा इशाराही त्यांनी दिला. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं आदी सर्व पक्षांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारी भूमिका घेतली आहे

सहकारमंत्र्यांच्या बंगल्यात महिलांनी कोंडून घेतले!
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 'जिजाऊ ब्रिगेड'च्या महिला कार्यर्कत्यांनी बुधवारी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मंत्रालयासमोरील सरकारी बंगल्यात घुसून स्वत:ला कोंडून घेतले. या महिलांना बाहेर येण्यास अनेक विनवण्या करूनही त्या बाहेर आल्या नाहीत. अखेर मुख्यमंत्र्यांशी आरक्षणावर आपली चर्चा घडवून आणतो, असे आश्वासन हर्षवर्धन पाटील यांनी दिल्यानंतर या महिला बाहेर आल्या! बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक असल्याने पाटील सकाळी मंत्रालयात गेले होते. दुपारी २१ महिलांचा गट पाटील यांच्या बंगल्यावर थडकला. अभ्यागत म्हणून आलेल्या महिलांची तेथील कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करायच्या आतच त्यांनी बंगल्यात घुसून आतून कड्या लावून घेतल्या. या अनोख्या आंदोलनामुळे बंगल्यावरील कर्मचारीही गोंधळले. त्यांनी तत्काळ हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. पाटील मंत्रिमंडळाची बैठक सोडून बंगल्यावर आले. खिडक्या बंद करण्यात आल्याने तसेच पडदेही लावून घेण्यात आल्याने पाटील यांनाही नेमके आत काय सुरू आहे, ते कळत नव्हते. त्यातूनच त्यांनी आतील महिलांशी संवाद साधून त्यांना बाहेर येण्यास सांगितले. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर बऱ्याच विनवण्या केल्यानंतर, आरक्षणाच्या विषयावर आमची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून द्या, अशी मागणी त्यांनी पुढे केली. ही मागणी मान्य करताच या महिला बंगल्याबाहेर आल्या. तोवर पाटील यांनी आरोग्य राज्यमंत्री शोभा बच्छाव यांना बंगल्यावर बोलावून घेतले होते. या महिलांपैकी पाच महिलांना शोभा बच्छाव मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेल्या. त्यावेळी या महिलांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. ........
दबावतंत्र थांबवा! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या भावना भडकावून दबावतंत्र आणण्याचा प्रकार आता थांबवा. मराठा समाजाचे आरक्षण हा सामाजिक विषय असून त्याचदृष्टीने याकडे पाहिले पाहिजे, असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी दिला. आरक्षणाबाबत आयोग तसेच मंत्रिमंडळाची उपसमितीही नेमण्यात आली कायदेशीर बाबी तपासून निर्णय होईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून काही महिला सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बंगल्यात घुसल्याचा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. या आंदोलनाचा समाचार घेताना ते म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्दा हा सामाजिक विषय असून त्याला न्याय देण्याचीच आमची भूमिका आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी आयोग नेमण्यात आला असून आयोगाने दिलेल्या अहवालाच्या अनुषंगाने कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या जात आहेत.


मराठा संघटनांचा मंत्र्याच्या बंगल्यावर कब्जा

मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी छावा, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मंत्रालयासमोरील बंगल्यावर हल्लाबोल केला. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी काही काळ हा बंगला आपल्या ताब्यात घेतला होता. मराठ्यांच्या आरक्षणाचा राडा आता पुन्हा एकदा पेटत असून, मुंबईत या संघटनांनी आझाद मैदानावर उपोषणास सुरुवात केली आहे. या आंदोलानाचा पुढील भाग म्हणून, या संघटनांनी बुधवारी मंत्रालयासमोरील हर्षवर्धन पाटील यांच्या ए-६ या बंगल्यावर आक्रमण केले. या हल्ल्यात काही महिला कार्यकर्त्यांनी स्वतःला बंगल्यात कोंडून घेतले. पण नंतर पोलिसांच्या कारवाईनंतर या महिलांनी आंदोलन मांगे घेतले, आणि त्या बंगल्याबाहेर आल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत.


No comments: